निवडुंगा विठोबा मंदिराशेजारील जागेत वारकरी भवन उभारा : मुख्य सभेत नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे लाखो भाविकांना विश्रांतीसाठी नाना पेठेतील मंदिराशेजारील मोकळ्या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाऐवजी(एसआरए) वारकरी भवन उभारावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांकडून आज मुख्य सर्वसाधारण सभेत केली.

मुख्य सर्वसाधारण सभा सुरू होताच नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी वारकरी भवन उभारा असा फलक सभागृहाच्या विंगेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समोर झळकाविला. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, गणेश ढोरे सहभागी झाले.

मुळात ही मोकळी जमीन पुणे महापलिकेच्या मालकीची असून ती प्राथमिक शाळा आणि मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु कालांतराने याठिकाणी 70 ते 80 झोपडपट्टी वसली. त्यानंतर विकसकाच्या आर्थिक फायद्यासाठी मागणी नसताना, घोषित झोपडपट्टी क्षेत्र नसताना देखील एसआरएचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित एसआरए रद्द करत त्याठिकाणी वारकरी भवन उभारावे अशी मागणी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेवक वनराज आंदेकर, नगरसेवक अब्दुल गफुर पठाण यांनी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. परंतु तो अद्याप मंजूर झाला नाही.

यापुर्वी अनेकवेळा वारकरी भवन उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु याठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी कोठे करावे, याबाबत महापालिकेपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित एसआरए विकसकाच्या विरोधात महापालिकेने न्यायालयात धाव घेतल्यामुळे वारकरी भवन नेमके कुठे उभारणार याबाबत संभ्रम कायम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.