BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेची इमारत रंगीत एलईडी दिव्यांनी लखलखणार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील विकास कामे करताना उभारले जाणारे पूल, इमारती व उद्याने सर्वसामान्यांचे आकर्षण ठरू शकेल, यासाठी स्थापत्य व विद्युत विभागाच्या वतीने त्याची सजावट केली जाते. महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेला भारतरत्न जे. आर. डी. टाटा हा दुमजली उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हा उड्डाणपूल आणखी आकर्षक व्हावा, यासाठी या पुलाला रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंग बदलत्या दिव्यांचे प्रकाशझोत शहरवासियांबरोबरच याठिकाणाहून ये -जा  करणा-या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. याशिवाय रावेत येथील बास्केट ब्रीज खास तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे.

पिंपरी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असून, दररोज लाखो प्रवाशांची या महामार्गावरून ये -जा होत असते. या इमारतीचे काही वर्षांपूर्वी विस्तारीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय सण, महापालिका वर्धापन दिन अशा विविध प्रसंगी या इमारतीला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे ही इमारत कायम नागरिकांचे आकर्षण ठरावे, याकरिता इमारतीला एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्याकरिता सुमारे 34 लाख रुपये खर्च येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.