Wakad : सराईत बुलेटचोराला ठोकल्या बेड्या

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाची कारवाई: 22 बुलेट मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत बुलेटचोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सराईत बुलेटचोर त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी चोरीच्या बुलेटवरून आला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तुषार भगवान अंबिलढगे (वय 19, रा. चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक वाकड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली की, एक बुलेटचोर काळेवाडी येथील धनगरबाबा मंदिराजवळ त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे चोरीची बुलेट आहे. त्यानुसार पोलिसांनी धनगरबाबा मंदिर परिसरात सापळा रचून आरोपी तुषार याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या बुलेट (एमएच 11 / सीएन 5491) बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. या बुलेटबाबत वाकड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी तुषार या यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून 22 रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार निकम, पोलीस कर्मचारी नदाफ, मुल्ला, आढारी, तांबोळी यांच्या पथकाने केली. सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.