Bullockcart Race : बैलगाडा शर्यतीबाबत 15 डिसेंबरला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा – खासदार अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवरील असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आजही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. या संदर्भातील पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. बैलगाडा शर्यतीबाबत 15 डिसेंबरला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती देण्यासाठी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, या व्हिडीओत त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मागच्या आठवड्यात याबाबत सुनावणी झाली होती, यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. आज झालेल्या सूनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू ऐकूण घेतली. महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत जो कायदा केला होता त्याला आव्हान देणारी याचिका पेटा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर देखील सूनावणी घेतली जावी अशी विनंती केली जात होती. तसेच, आजवर झालेली सूनावणी या सगळ्याबाबत येत्या 15 डिसेंबरला पुढील सूनावणी निश्चित केली आहे.’

‘आजवरचा सर्व प्रवास पाहता एक आशेचा किरण निर्माण झाला असून, येत्या 15 डिसेंबरला महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालय सकारात्मक निर्णय देईल. अशी अपेक्षा बाळगूया,’ असे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.