Bhosari : गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घातल्या तीन सराईत चोरट्यांना बेड्या; 35 मोबाईल फोन जप्त

एमपीसी न्यूज – तीन सराईत चोरट्यांकडून 35 मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकल असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने भोसरी एमआयडीसी परिसरात केली.

करण विजय लाळगे (वय 19, रा. भोसरी), रणजित रामशंकर गुप्ता (वय 19, रा. भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस त्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. त्यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून मोबाईल हिसकावणारे दोघेजण मोबाईल विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार भोसरी एमआयडीसीमधील गोडाऊन चौक येथे सापळा रचून करण आणि रणजित या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले 12 मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल मिळून आले.

अटक केलेल्या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून भोसरी एमआयडीसी परिसरात मोबाईल चोरल्याचे कबूल केले. तिघांकडून पोलिसांनी 4 लाख 30 हजार रुपये किमतीचे 35 मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकल जप्त केल्या. या कारवाईमुळे भोसरी एमआयडीसी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

रणजित गुप्ता हा भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातून ज्या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून नेले असतील अशा नागरिकांनी मोहननगर येथील गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त रामराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, बाळू कोकाटे, प्रवीण पाटील, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, सचिन मोरे, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.