Pune : दहीहंडीची वर्गणी न दिल्याच्या रागातून मोटारसायकल जाळली

एमपीसी न्यूज – दहीहंडीची वर्गणी न दिल्याच्या रागातून एकाची मोटारसायकल जाळण्याचा प्रकार आंबेगाव खूर्द येथे घडला. ही घटना आज रविवार (दि.2) सकाळी पावणेसहाच्या दरम्यान पृथ्वीराज अपार्टमेंट आंबेगाव खूर्द येथे घडला. या प्रकरणी प्रफुल्ल थोरात (वय 20, रा. अश्विनी विहार आंबेगाव खूर्द, पुणे), यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली आहे.

दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम, सुमित राजू अहिवाळे (रा. सच्चाई माता, कात्रज, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी थोरात यांना आरोपी शिंदे याने एक सप्टेंबरच्या मध्यरात्री दीडच्या दरम्यान 500 रुपये वर्गणी मागितली होती. मात्र, थोरात यांनी देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग डोक्यात ठेवून शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी आज पहाटे फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये मोटारसायकाल पार्क केली असता अन्य गाड्यांतील पेट्रोल काढून फिर्यादींची मोटारसायकल जाळून टाकली. यामध्ये इमारतीच्या पार्किंगचा काही स्लॅबदेखील जळाला. घटनेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, फिर्यादींनी चौघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.