Pimpri News:  शाळा सुरु नसताना टेबल खुर्च्याची खरेदी, चौकशी करा – राहुल कोल्हटकर

एमपीसी न्यूज : शाळा कधी सुरू करायच्या याबाबतीत शासन निर्णय होणे बाकी असताना महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने साहित्य खरेदी केले आहे. जून 2020 मध्ये 1  कोटी 86 लाख रूपये खर्च करून बालवर्गासाठी खरेदी केलेल्या टेबल खुर्च्यांच्या खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी साद सोशल फांऊडेशनचे संघटक राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या शिक्षण विभागाने  बालवर्गासाठी टेबल खुर्च्या यांची मागणी भांडार विभागाकडे केली. शिक्षण विभागाच्या मागणी नुसार भांडार विभागाच्या वतीने जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली.

खरेदीप्रक्रियेच्या करीता आलेल्या तीन निवेदापैकी निलकमल कंपनीला हे काम देण्यात आले.  प्लॉस्टीक डेस्क, टेबल खुर्च्या असे मिळून 1 हजार नग तर चार खुर्च्यांसोबत गोल टेबल असे 2 हजार नग खरेदी केली .

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हापासून आजपर्यंत शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू करायच्या याबाबतीत शासन निर्णय होणे बाकी असताना अशा परिस्थितीत जूनमध्ये ही खरेदी केली. बालवर्गामध्ये साहित्य वाटप झाले नसताना सुद्धा संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले. साहित्य कोठे आहे याची कोणालाच माहिती नाही. त्यामुळे शिक्षण विभाग व भांडार विभागाच्या वतीने खरेदी केलेल्या या  प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी.

सत्यपरिस्थिती जनतेसमोर आणावी आणि संबंधीत खरेदीत गैरव्यवहार झाला असल्यास  ठेकेदार व  अधिका-यांवर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.