Dapodi : 2019 अखेर पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावणार – ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु होऊन दोन पूर्ण झाली आहेत. या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम 40 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

दापोडी येथील मेट्रो कार्यालयात ब्रिजेश दीक्षित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक महेश कुमार, एस शिवनाथन, गौतम बि-हाडे, राजेंद्र प्रसाद, रामनाथ सुब्रमण्यम आदी उपस्थित होते.

ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सुरु होण्यासाठी महामेट्रोने पाच वर्षांचे ध्येय निश्चित केले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने कामे सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पिलरचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे 2019 मध्ये स्टेशनच्या कामांना गती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रील, फिटिंग, ट्रॅक, वीज आणि सिग्नलचेही काम त्याच वेगाने करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकाराम नगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरु आहे.

2019 च्या सुरुवातीला खडकी ते रेंजहील हे काम सुरु होईल. खडकी, दापोडी आणि रेंजहील येथील संरक्षण विभागाच्या जमिनीसाठी 17 कोटी 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर लायसन्ससाठी दरवर्षी 1 कोटी 71 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या मार्गावरील संरक्षण विभागाच्या परवानगीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी ते निगडी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेमध्ये त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तिथून राज्य सरकार आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी अहवाल जाणार आहे. येत्या तीन महिन्यात पिंपरी ते दापोडी या मार्गावर ट्रॅक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही दीक्षित म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.