Pune : ‘जीएसटी’च्या यशात सीए, कर सल्लागार महत्वाचा – राजेश पांडे

 ‘आयसीएआय’ व 'डब्ल्यूएमटीपीए'तर्फे ‘जीएसटी व रेरा’वर परिसंवाद

एमपीसी न्यूज – गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्वाची आहे. या दोन्ही कायद्यात काही अडचणी येत आहेत. त्यासाठी येत्या काळात त्यामध्ये सुधारणा करून जीएसटी अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे  केंद्रीय जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजेश पांडे यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभाग व दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ’जीएसटी आणि रेरा’ या विषयावरील ‘ज्ञानसंगम 2018’ या  एक दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटनावेळी राजेश पांडे बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी आयसीएआय पुणेच्या उपाध्यक्षा व ‘ज्ञानसंगम-2018’च्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, ‘डब्ल्यूएमटीपीए’चे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, अध्यक्ष नवनीतलाल बोरा, ‘आयसीएआय’चे सचिव राजेश अग्रवाल, खजिनदार अभिषेक धामणे, ऍड. मिलिंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले, “जीएसटी आणि रेरा या कायद्यांत सतत बदल करावे लागत आहेत. हे बदल स्वीकारून कर सल्लागार, सीए आणि करदाते यांनी एकत्रितपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अशा संस्थांना बरोबर घेऊन जीएसटीतील बदलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जावा. कर भरणाऱ्यांनी वेळेत कर भरावा. आधी दिरंगाई होते आणि मग तारखा वाढवून द्याव्या लागतात. त्याचा अतिरिक्त ताण यंत्रणेसह सगळ्यांवरच पडतो.”
_MPC_DIR_MPU_II
“कर सल्लागारांनी करदात्याच्या सगळी दुःखे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना उद्योग वृद्धीसाठी लक्ष केंद्रित करण्यास वेळ द्यावा. त्यासाठी कायद्यातील बदलांचे ज्ञान आपण घेऊन त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी. येत्या काळात सर्वांकडून अभिप्राय मागवून जीएसटीमध्ये आणखी बदल केले जातील. जेणेकरून जीएसटी ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनेल आणि करप्रणाली अधिक सुकर होईल,” असेही त्यांनी नमूद केले.
परिसंवादात जीएसटी व रेरा यासंदर्भातील नवीन कायदे समज गैरसमज, यादरम्यान येणारा मानसिक ताणतणाव यावर मार्गदर्शन सत्रे झाली. यामध्ये सीए केल्विन शहा यांनी ‘वार्षिक कर परतावा आणि जीएसटी ऑडिट’, ज्ञानवत्सल स्वामी यांनी ‘ताणतणाव व्यवस्थापन’, तर ऍड. रतन शामल यांनी ‘रेरा : पुनर्विकासातील अडचणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ऍड. मिलिंद भोंडे, ऍड. अभय बोरा, सीए प्राजक्ता शेट्ये-देव व सीए यश नागर यांनी सहभाग घेतला.
नवनीतलाल बोरा यांनी आपले विचार मांडले. नरेंद्र सोनावणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए ऋता चितळे यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ऍड. मिलिंद भोंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.