Jitendra Awhad Donates Plasma : वाढदिनी गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान 

Cabinet Minister of housing Dr. Jitendra Awhad donates plasma on the occassion of his birthday.

एमपीसी न्यूज – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.  कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये, त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.

गृहनिर्माणमंत्री डॉ.आव्हाड यावेळी म्हणाले जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे.

तसेच आनंद परांजपे यांनी कोरोनावर मात केली आहे व त्यांनी देखील आज प्लाझ्मादान केले आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते.

मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालसोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते.

मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे.

या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान 100 जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.