Pune Crime News : चोरी करण्यासाठी आले; मात्र महिलेचा रुद्रावतार पाहून चोर गेले पळून

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील इंदापूरात एका महिलेने चार शस्त्रधारी चोरट्यांचा मुकाबला करत त्यांना पळवून लावले. तीन जून रोजी ही घटना घडली. चोरटे घरात शिरले असते तर त्यांनी आपल्या लहान बाळाला दुखापत केली असती असा विचार करून ही माता चोरट्यांच्या अंगावर धावून गेली आणि या मातेचा हा रुद्रावतार पाहून चारही शस्त्रधारी चोरटे अक्षरशः पळून गेले. हा सर्व थरार शेजारीच असणार्‍या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरातील पुणे सोलापूर महामार्गालगत फर्निचरचे दुकान आहे. या शेजारी असणाऱ्या एका जागेवर उत्तर प्रदेशातील एक कुटुंब राहण्यास आहे. त्या ठिकाणी ते पुठ्याचा व्यवसाय करतात. या मोकळ्या जागेवर त्यांनी पत्र्याचे शेड उभारले आहे. पत्नी नीलम कश्यप, पती धर्मराज कश्यप व आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी राहतात. त्यांचे इतर काही नातेवाईक देखील त्यांच्या शेजारीच राहतात.

Talegaon Crime News : चित्रपट लेखकाला दगडाच्या धाकाने लुटले; चित्रपटाच्या हार्डडिस्कही पळवल्या

दरम्यान तीन जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास चार शस्त्रधारी चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आले. या चोरट्यांनी कश्यप यांच्या पत्र्याच्या शेडचा समोरील पुठ्ठा बाजूला काढला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातील एका चोरट्याने घरात पाऊल टाकला होता. मात्र नीलम कश्यप या घरात लहान बाळाला दूध पाजत होत्या. आपल्या घरात चोरटे शिरत असल्याचे पाहून त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. सुरूवातीला चोरट्यांनी त्या महिलेला चाकूचा धाक दाखवत हल्ला केला. मात्र या महिलेने यानंतर रुद्रावतार धारण केला आणि कसलीही भीती न बाळगता ती या चोरांच्या अंगावर धावून गेली. नीलम कश्यप यांचा हा रुद्रावतार पाहून चोरटे मात्र पळून गेले. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नीलम यांनी दाखवलेल्या या धाडसाचे पोलिसांनीही कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.