Canada : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

एमपीसी न्यूज- आपल्या अष्टपैलू अभिनयातून रसिकांची मने जिंकणारे जेष्ठ अभिनेते, पटकथा संवाद लेखक कादर खान (वय 81) यांचे कॅनडा येथे आज निधन झाले. त्यांच्यानिधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून एक सच्चा कलावंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कुटुंबीयांसोबत कॅनडाला वास्तव्यास असलेले कादर खान हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी या व्याधीने ग्रस्त होते. त्यांना विस्मृतीचाही आजार जडला होता. श्वसनाचा त्रास वाढल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

कादरखान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबूलमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनय आणि लेखनाची आवड होती. 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चार दशकांमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायक, विनोदी अभिनेता, चरित्र नायक अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या.अचूक टायमिंग हे त्यांच्या विनोदाचे वैशिष्ट्य होते. सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोटभरून हसवले. अदालत, खून पसिना, कुर्बानी, याराना, कुली, मवाली, धडकन ही काहीत्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची नावे आहेत.

अभिनयाबरोबरच पटकथा लेखक म्हणून त्यांची ओळख होती. अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर ही त्यांच्या पटकथा लेखन केलेल्या चित्रपटांची नावे आहेत. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला तर 2013 मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.