New Delhi : भारतीय रेल्वेकडून 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द; श्रमिक विशेष ट्रेनची सेवा राहणार सुरू

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग केलेल्या प्रवाशांची 30 जून पर्यंतची तिकिटे ऑटोमॅटीक पद्धतीने रद्द होणार आहेत. याबाबतची  घोषणा भारतीय रेल्वेकडून करण्यात आली आहे. या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. मात्र, स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमीक विशेष ट्रेनची सेवा सुरुच राहणार आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे. रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये एसी कोच तसेच स्लीपर कोचचीही व्यवस्था असणार आहे.

या ट्रेनसाठी वेटींगची सुविधाही उपलब्ध असून तिकिटांची संख्या मात्र मर्यादित आहे. दिल्लीवरुन चालवण्यात येणाऱ्या विशेष 15 पॅसेंजर ट्रेनची सेवा कायम राहणार आहे.

या विशेष ट्रेन आणि मेल्समध्ये स्लीपर कोचमध्ये 200 पर्यंत, तर वन एसीमध्ये 20, टू एसीमध्ये 50, तर थ्री एसीमध्ये 100 पर्यंत वेटींगची सुविधा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष मेल ट्रेन्समध्ये महिला आणि वरिष्ठांसाठी विशेष डब्बा राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, या ट्रेनसाठी तत्काळ आणि प्रिमियम तक्काळची सेवा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

अत्यावश्यक माल वाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेची सेवा 22 मार्चपासून स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर 11 मे पासून देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी भारतीय रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. यासंदर्भातील रेल्वेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

नवीन नियमांनुसार प्रवाशांना स्वत:चे जेवण, अंथरुण-पांघरुण स्वतः आणावे लागणार आहे. रेल्वने प्रवास करण्याआधी प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याने गाडी सुटण्याच्या अगोदर 90 मिनिटं स्थानकात पोहचण्याच्या सूचना प्रवाशांना करण्यात आल्या आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डानलोड करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.