BNR-HDR-TOP-Mobile

Pune : घराची नोंद करण्यासाठी लाच मागणा-या सरपंच, उपसरपंचाचे पद रद्द

एमपीसी न्यूज – घरपट्टीची आणि घराची नोंद करण्यासाठी मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच या दोघांना तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी याप्रकरणाचा निकाल देत या दोघांचीही पदे रद्द केली आहेत.
सरपंच मछिंद्र चंद्रकांत कराळे, उपसरपंच गणेश गजानन मानकर (दोघे रा. आंबवणे, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. मुळशी तालुक्यातील देवघरगावात नेचर सोसायटी जवळ एकाचे 4 हेक्टर 45 गुंठे क्षेत्र आहे. त्यात त्यांनी 2 हजार चौरस फुटांचे घर बांधले आहे. घराची देखभाल, खरेदी-विक्री व अन्य शासकीय कामे तक्रारदार पाहतात.
आरोपी उपसरपंच गणेश मानकर याने तक्रारदार यांची लोणावळा येथे भेट घेऊन घरपट्टी आणि घराची नोंद करण्याबाबत विचारणा केली. तसेच त्यासाठी 50 हजार रुपये लागतील, असेही सांगितले. दोन दिवसांनी तक्रारदार यांनी उपसरपंच मानकर यांची भेट घेतली. त्यावेळी मानकर याने सरपंचासोबत मिळून तीन लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. एसीबीने सापळा रचून सरपंच कराळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली.
सरपंच कराळे आणि उपसरपंच मानकर या दोघांनी मिळून स्वतःच्या अधिकारांचा आणि पदाचा दुरुपयोग करून आर्थिक फायदा मिळवला. दोघांनी मिळून लाच घेऊन गैरवर्तणूक व लांछनास्पद कृत्य केल्याबद्दल दोघांनाही पदावरून काढण्यात येत असल्याचा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला. अॅड. शैलेश म्हस्के यांनी तक्रारदार यांच्या बाजूने युक्तिवाद केला.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3