Pune : महापालिका उभारणार कॅन्सर रुग्णालय 

एमपीसी न्यूज – कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर शहरातील गोरगरिबांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यास महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली आहे.

शहरातील गोरगरीब रुग्णांना कर्करोगावर ससून रुग्णालयात उपचार घेता येतात. मात्र, या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील गोरगरिबांना कर्करोगावर शासकीय दरात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी पालिकेच्या वतीने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि सम्राट थोरात यांनी महिला व बालकल्याण समितीला दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव अभिप्रायासाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला होता. अशाप्रकारचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय आरोग्य विभागाने दिल्यानंतर आज झालेल्या समितीच्या बैठकीत प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

देशातील १ लाख लोकसंख्येमागे सुमारे ५० रुग्ण कर्करोगाने ग्रस्त आहेत. दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सुमारे ८ लाखाने वाढत आहे. हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे ५ लाख ५६ हजार रुग्णांचा मृत्यू कर्करोगाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून, त्यात तोंड, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस, प्रोस्टेट या अवयवांना होणारा कर्करोग आणि महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. रुग्णालयासाठी लागणारी जमीन, इमारत, आर्थिक तरतूद आणि अपुरे मनुष्यबळ या सर्व बाबी विचारात घेता, पालिकेने फक्त कॅन्सर रुग्णालय उभारणे संयुक्तिक होणार नाही.

त्यामुळे पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर हे रुग्णालय उभारून सेवा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबांना अल्प दरात सेवा मिळेल, असे अभिप्रायामध्ये नमूद करण्यात आले आहे. आता हा प्रस्ताव स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.