Talegaon News : शहर परीसरात पाच ठिकाणी गांजा पकडला; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरात पाच ठिकाणी गांजा पकडण्यात आला. यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पाचही कारवायांमध्ये तीन किलो 390.6 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया झाल्या आहेत. त्यातील पहिल्या कारवाईमध्ये सचिन धर्मा बधाले (वय 32, रा. मिंढेवाडी, ता. मावळ), ज्ञानेश्वर लोंढे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 91 हजार 575 रुपयांचा तीन किलो 663 गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे दुसरी कारवाई केली. त्यात प्रकाश राघू ढोरे (वय 61, रा. इंदोरी, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्याकडून 11.06 ग्रॅम गांजा आणि चिलीम असा 520 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई देहूरोड पोलिसांनी केली. सोहेल शाकीर इनामदार (वय 23), अनिकेत हेमंत भोरे (वय 23, दोघे रा. देहूरोड) यांना अटक केली असून त्यांच्याकडून 200 रुपयांचा 10 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. हे दोघेजण एका शाळेजवळ गांजा ओढत बसले असताना पोलिसांनी कारवाई केली.

चौथी कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बालाजीनगर झोपडपट्टी येथे केली. त्यात पोलिसांनी विजय मरिअप्पा गोटे (वय 20, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. आरोपी विजय एका कंपनीच्या भिंतीच्या कडेला बसून गांजा ओढत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पाचवी कारवाई चाकण पोलिसांनी केली आहे. अंकित विरविरेन्द्र सिंग (वय 26, रा. चिंबळीफाटा, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चिलीम आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी अंकित देखील गांजा ओढताना पोलिसांना आढळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.