Wakad : कार रिपेअरिंगच्या बहाण्याने ग्राहकाची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कार रिपेअर करण्यासाठी ग्राहकाकडून 19 हजार रुपये घेतले. ठरलेल्या वेळेत ग्राहकाला त्यांची कार परत न करता ग्राहकाची 5 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2019 ते 20 जानेवारी 2020 या कालावधीत वाकड येथे घडला.

अजय दिनकर सुर्यवंशी (वय 50, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश महामुनी (रा. भारतामाता चौक, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रकल्प विभागात डेप्युटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर एसयुव्ही फोर्ड इन्डेव्हियर ही कार एम एच 14 / सी एस 9643) आहे. ती कार त्यांनी सेकंड हँड विकत घेतलेली आहे. त्यांनी त्यांची कार मानकर चौकातील ओम साई गॅरेजमध्ये रिपेअरिंगला दिली होती. गाडी रिपेअर होत नसल्याचे गॅरेजमधून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी फोर्ड शिवालिक सर्व्हिस स्टेशनच्या सल्लागाराशी संपर्क केला असता त्यांनी गाडी रिपेअरिंग करून विकून देण्याचे अमिश दाखवले. सूर्यवंशी यांनी फोर्ड शिवालिक सर्व्हिस स्टेशनला 24 डिसेंबर रोजी कार रिपेअरिंगसाठी 19 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून दिले.

सूर्यवंशी यांनी 27 डिसेंबर रोजी कार नेऊन दिली. त्यानंतर रिपेअरिंगसाठी आणखी तीन हजार रुपये लागत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सूर्यवंशी यांनी पुन्हा ऑनलाईन तीन हजार रुपये पाठवले. 19 हजार दिल्यानंतर फोर्ड शिवालिक सर्व्हिस स्टेशनमधून त्यांची कार रिपेअरिंग, विकून अथवा परत केली नाही. याबाबत सूर्यवंशी यांनी सर्व्हिस स्टेशनला संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कार देण्याबाबत टाळाटाळ केली. आरोपी महामुनी याने सूर्यवंशी यांना पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी दिली.

सूर्यवंशी हे आरोपी महामुनीच्या घरी गेले असता त्याने सूर्यवंशी यांची कार त्याच्या मित्राला दिली असून रात्रीपर्यंत परत आणून देतो असे सांगितले. त्यानंतरही आरोपीने कार न देता सूर्यवंशी यांना पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले. महामुनी याने सूर्यवंशी यांच्याकडून पैसे घेऊनही कार रिपेअर न करता तसेच कार न देता त्यांची 5 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.