Pune : आयुषमान भारत योजनेचे कार्ड आमदारांनी पळवले – चेतन तुपे

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड जे नागरिकांसाठी आले होते ते आमदारांनी पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. 

पंतप्रधानांनी सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. आठ महिन्यांपूर्वी डिसेंबर 2018 मध्ये या योजनेतील लाभार्थींचे कार्ड महापालिकेत आले. त्यानुसार प्रशासनाने त्यांना कळवले. त्यामध्ये जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातून आपले कार्ड घेऊन जा, असेही कळवण्यात आले. लाभार्थी जेव्हा कार्ड घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना कार्ड आमदारांनी नेल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तुपे यांनी केला आहे.

प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत आमच्याकडे तक्रार केली असून, योजनेचे कार्ड आम्हाला दिले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर याविषयी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता एका आमदाराने लाभार्थ्यांचे कार्ड चोरून नेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात जा आणि कार्ड मिळवा, असे सांगण्यात आल्याचा आरोपही तुपे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.