दहावीनंतर पुढे काय ?… चिकित्सक विचार कौशल्य – काळाची गरज (भाग चौथा)

एमपीसी न्यूज- जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करियर निवडीची. कोणते करियर निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करियरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर निवडल्यास विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया जातात. म्हणूनच एमपीसी न्यूज घेऊन येत आहे करियर निवडीवर मार्गदर्शन करणारी मालिका ‘दहावीनंतर पुढे काय ?’ यामध्ये मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. समिता प्रशांत चव्हाण या मार्गदर्शन करणार आहेत.

चिकित्सक विचार कौशल्य – काळाची गरज

माहितीचे किंवा अनुभवांचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण आणि परीक्षण करण्याची क्षमता म्हणजेच चिकित्सक विचार कौशल्य होय. चिकित्सक विचार कौशल्य व मानसिक क्षमता यांमध्ये वाढ करण्यासाठी पालक व शिक्षक फार मोठी भूमिका बजावू शकतात. कारण अभ्यास, माहितीचा महापूर, सर्वच स्तरांवरील स्पर्धा, भविष्याची काळजी, पालकांच्या अवास्तव अपेक्षा यासारख्या गोष्टीमुळे आजची मुल ताण तणावात आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कलागुणांना वाव देता येणे अवघड जाते. अशा वेळेस त्यांना स्वतःचे अस्तित्व ओळखण्यासाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ देणे गरजेचे आहे. मुलांना स्वः ची जाणीव करायला लावणे महत्वाचे आहे. त्यांना स्वतः मधील बलस्थाने ओळखायला शिकविले पाहिजे. आपण काय चांगले करू शकतो किंवा काय करू शकत नाहीत हे ठरवता आले पाहिजे. स्वः ची जाणीव म्हणजेच चिकित्सक विचार कौशल्य होय. म्हणूनच मुलांना चिकित्सक विचार करायला लावणे महत्वाचे आहे. चिकित्सक विचारांमधील परिपक्वता ही मनन व चिंतनातून प्राप्त होते.

आजच्या विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार कौशल्याचा अभाव जाणवतो. विचार करण्याची वृत्ती न जोपासणारे विद्यार्थी स्वतःची, कुटुंबाची, समाजाची व देशाची कोणतीच प्रगती करू शकत नाही. शिक्षणाचा मूळ उद्देश्य विद्यार्थ्यांना सृजनशील, चिकित्सक व विचार प्रवर्तक बनविणे हा असायला हवा. शिक्षण या शब्दाचाच अर्थ विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करणे असा आहे. कारण एखादे मत तयार करण्यासाठी त्या गोष्टीचा सारासार विचार करावा लागतो, त्यावर चिंतन, मनन करावे लागते.

बऱ्याच वेळा शाळांमधून विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नाविषयी किंवा समस्यांविषयी विषयी तयार उत्तरे दिली जातात. त्यांना स्वतः चा विचार करण्याची संधीच दिली जात नाही. शालेय विषयातील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना शोधायला न लावता उत्तरे लिहून दिली जातात किंवा गाईड मधून लिहावयास सांगितली जातात आणि त्यांची चिकित्सक विचार करण्याची वृत्ती दाबून टाकली जाते. विद्यार्थ्यांमधील वैचारिक ताकदीविषयीची जाणीव करूनच दिली जात नाही. निकालाचा टक्का वाढावा म्हणून सगळे काही तयार दिले जाते. त्यांच्या पाठांतराला महत्व दिले जाते आणि पर्यायाने त्यांना परावलंबी केले जाते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा पास होतात. पण जीवनाच्या परीक्षेसाठी तयार झालेली नसतात. त्यामुळे मुलांना एखाद्या विषयावर अनेक बाजूंनी विचार करायला शिकवावे.

विद्यार्थ्यांना केवळ “मी सांगतो तुम्ही ऐका” असे श्रोते करण्यापेक्षा स्वतंत्र विचार करणारे व्यक्ती बनविणे ही शाळेचीच जबाबदारी असायला हवी. विद्यार्थ्यांना स्वतःच्या विचारांना चालना कशी मिळेल याची खबरदारी शिक्षकांनी घ्यायला हवी. त्यासाठी विषय शिकविण्यात वेगळेपणा यायला हवा. यात शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे शिकणे आणि त्याची प्रक्रिया याला महत्त्व दिले पाहिजे, तेव्हाच विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल.
इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आपल्यावर माहितीचा मारा होत असतो. कारण आपल्याला ज्या गोष्टीवर फोकस करायचे आहे, त्या गोष्टी आपण सर्च केल्या की आपल्याला त्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर उपलब्ध होतात.

आजच्या युगातील परवलीचा शब्द म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीची कमाल अशी की आपण ज्या गोष्टी इंटरनेटवर सर्च केल्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, त्यांचा एक डेटाबेस तयार केला जातो आणि त्याचे विश्लेषण करून आपल्याला त्याच पद्धतीच्या लिंक्स, व्हिडिओ, इमेजेस, बातम्या दिसतील अशी व्यवस्था केली जाते. थोडक्यात आपल्या मुलांच्या धडावर त्यांचे डोके राहणार नाही तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर खुबीने करणाऱ्या समाजविघातक शक्तिंचे डोके असेल. हे अतिशय भयानक वास्तव आणि दुष्टचक्र आहे. म्हणून आज कधी नव्हे इतकी पालकांची जबाबदारी वाढलेली आहे.

मार्गदर्शक-
डॉ. समिता प्रशांत चव्हाण
मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक
पत्ता-
संकल्प: ए सेंटर फॉर कॉम्पिटेन्सी असेसमेन्ट
322, गुरूदत्त अपार्टमेंट, दुसरा मजला,
विठ्ठल मंदिर जवळ, नवी पेठ, पुणे-30
मो.- 7028896981/82

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.