Pimpri: शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजी; ‘वायसीएमएच्‌’च्या डॉक्‍टर, परिचारिकेला सक्‍त ताकीद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया करताना कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत भुलतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला आणि परिचारिकेला सक्त ताकीद देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सक्त ताकीद दिली आहे. 

भुलतज्ज्ञ डॉ. राजेश भाऊसाहेब गोरे आणि परिचारिका जयश्री राजेंद्र कुंभार यांना  सक्त ताकीद देण्यात आली आहे.  बाळासाहेब देंडगे यांच्या पायावर 16 सप्टेंबर 2016 रोजी पालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएमएच्‌ रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत झाल्याने पायाला गँगरिन झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे देंडगे यांचा  24 सप्टेंबरला पाय काढावा लागला होता. भुलतज्ज्ञ डॉ. राजेश गोरे आणि परिचारिका जयश्री कुंभार यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली.

यामध्ये शस्त्रक्रियेचा कालावधी वाढल्याने, रुग्णाला स्थिर ठेवणे व शुद्धीत आणण्यासाठी डॉ. गोरे यांनी प्रयत्न केले. मात्र, शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्यानंतर रुग्णाचा फिटनेस व टू डी इकोच्या आवश्‍यक्तेबद्दल सिनिअर फिजीशियन रिव्हीव्ह यांनी नोटीस लिहून स्वाक्षरी करणे आवश्‍यक होते. मात्र, डॉ. गोरे यांनी ही खबरदारी घेतली नसल्याचे आढळले आहे.

या प्रकरणी झालेल्या चौकशीत डॉ. गोरे हे अंशत: दोषी आढळले. मात्र वायसीएम रुग्णालयात ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिव्ह प्रोटोकॉल’  निश्‍चित केलेला नाही. त्यामुळे दोषमुक्त करण्याची मागणी डॉ. गोरे यांनी केली होती; मात्र या घटनेला डॉ. गोरे हे पूर्णत: जबाबदार नसून, अंशत: जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांना सक्त ताकीद देण्याची शिफारस विभागप्रमुखांनी केली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कामकाजात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत डॉ. गोरे यांना सक्त ताकीद दिली आहे.  तसेच भविष्यात कर्तव्यपालनामध्ये कसूर केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचबरोबर परिचारिका जयश्री राजेंद्र कुंभार यांची खातेनिहाय चौकशी केली होती. रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना कुंभार यांनी कामकाजात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  त्यामुळे त्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.