Maval : सुरक्षा नियमांचे पालन करून स्वतःची आणि यंत्रांची काळजी घेतल्यास समृद्धीकडे वाटचाल – मुरलीधर साठे

एमपीसी न्यूज – एखाद्या कंपनी कामगाराने निष्काळजीपणा केल्यास यंत्राचे आणि पर्यायाने उत्पादनाचे नुकसान होते. याशिवाय त्यातून अपघात घडल्यास संबंधित कामगार कायमस्वरूपी अपंग होऊ शकतो अथवा दुर्दैवाने जीव गमावू शकतो. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केल्यास उत्पादनक्षमता वाढते आणि उद्योगाची समृद्धीकडे वाटचाल सुरू होते, असा विश्वास उद्योजक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी शुक्रवारी (दि. 6) मावळ येथे व्यक्त केला.

औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त अभिजित इंजिनिअर्स, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि दिलासा संस्था यांनी ‘माझी सुरक्षा, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुरलीधर साठे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, अभिजित इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक दादासाहेब उऱ्हे, संचालक शशिकांत हळदे, दिलासाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक, गुणवंत कामगार अरुण गराडे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थिती असलेल्या कामगारांचे प्रबोधन करताना पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, “केवळ यंत्रावर काम करीत असताना किंवा सुरक्षा सप्ताह सुरू असताना सुरक्षा साधनांचा वापर करणे पुरेसे नाही; तर घरात, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील सुरक्षा साधनांचा आवर्जून उपयोग केला पाहिजे!” शशिकांत हळदे यांनी आपल्या मनोगतातून अभिजित इंजिनिअर्स आपल्या दैनंदिन कामकाजात राबवत असलेल्या विविध सुरक्षा उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी झालेल्या कविसंमेलनातून राजेंद्र वाघ, कैलास भैरट, शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ यांनी सुरक्षेविषयी प्रबोधन करणाऱ्या विविध आशयाच्या कविता सादर करून कामगारांना माहीती दिली. दिगंबर ढोकले यांनी कामगारांना सुरक्षापालनाची सामूहिक शपथ दिली. सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर  सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.