Pune : संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यावरच संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – कोरोना विषयी अफवा पसरविल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करणारे निवेदन घेऊन आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावरच पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून पोलिसांकडे निवेदन घेऊन जाणे ही बाब संचारबंदीमध्ये येत नसल्याचा ठपका ठेवत बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेमंत बाबुराव पाटील (वय 50, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना ग्रस्तांना बरे करण्यासाठी अफवा पसरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करणारे पत्र घेऊन आरोपी पाटील बुधवारी (दि. 1) दुपारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत गेला होता.

आरोपी हा भारत अंगेंस्ट करप्शन या संघटनेचा अध्यक्ष आहे. मात्र, नागरिकांनी संचारबंदीच्या कालावधीत अशा प्रकारे पत्र घेऊन पोलिसांकडे येणे ही बाब संचारबंदीमध्ये सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेत येत नाही.

त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन केल्याने पाटील याच्यावरच भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.