Maharashtra News : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते.

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी रुग्णालयात कार्यरत होते. 2016 मध्ये चार लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती.

त्यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे किशोर वाघ दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर किशोर वाघ यांच्यावर निलंबन वगळता इतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.