Wakad : विनापरवाना जाहिरात लावल्याने रॉयल अकॅडमीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची परवानगी न घेता महापालिकेच्या हद्दीत जाहिरातीचे फलक लावले. यावरून रॉयल अकॅडमी पिंपरी-चिंचवडचे संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रॉयल अकॅडमीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल अकॅडमी पिंपरी-चिंचवड यांचे पोस्टर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळेवाडी येथील महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील खांबावर जाहिरातीचे स्टिकर चिकटवले. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या निदर्शनास आला. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच विनापरवाना पोस्टर लावण्यास बंदी असूनही त्याविरोधात पोस्टर लावले, यावरून रॉयल अकॅडमीच्या संचालकाविरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणाच्या प्रतिबंध अधिनियम १९९५ मधील कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.