Caste Certificate : विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे बार्टीचे आवाहन

एमपीसी न्यूज : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी‍ समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करावा, त्यामुळे विहीत वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.