Pimpri : मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी

बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांची मागणी 

एमपीसी  न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी पक्ष व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले असून, त्यावर मस्तवालपणे ताव मारण्याचे काम चालू आहे. यासाठी महापालिकेचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. या भ्रष्टाचारात सहभागी असणारे मनपा आयुक्त हर्डीकर हे या भ्रष्टाचारात अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. त्यामुळे त्यांची बदली करून, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की,  मागील पक्षाच्या सत्ताकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाढत्या भ्रष्टाचाराला वैतागून शहरवासीयांनी भाजपला सत्ता मिळवून दिली. परंतु, नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना विरोध न त्यांच्या चुकीच्या व बेकायदेशीर कामे करणारे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत आहेत. स्थायी समितीने वाढीव दराने मंजूर केलेल्या निविदांना आक्षेप घेण्याऐवजी आर्थिक हितासाठी त्या निविदांना मंजुरी देण्याचा सपाटा चालू आहे. ठेकेदार विविध विकास कामांच्या निविदेत रिंग करतात. त्यास विरोधी व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आक्षेप घेत असतानाही आयुक्त त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.

शहरातील ठराविक ठेकेदारांना कामे देवून त्यांना पोसण्याचा उद्योग आयुक्त करत आहेत. शहरातील स्मार्ट सिटी, तसेच पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली-लोहगाव येथील 92 कोटींच्या रस्त्याचे काम, डॉक्टर निवासस्थानाचे नुतनीकरण, अशा इतर असंख्य निविदा वाढीव दराने मंजूर करून, कोट्यावधींचा भ्रष्टाचार शहरात चालू आहे. शहरातील अशा विविध विकासकामांच्या वाढीव खर्चांच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करून, आयुक्त लाखो नागरिकांच्या कररूपी पैशांवर दरोडा टाकीत आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे व या भ्रष्टाचाराचे मुळ असणारे आयुक्त हर्डीकर यांची खातेनिहाय व सीबीआयमार्फत चौकशी करावी, अन्यथा बहुजन सम्राट सनेच्या वतीने मंगळवार (दि. 29) रोजी सकाळी 11 वा. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यास उच्च न्यायालयात पुराव्यानिशी धाव घेतली जाईल, असे या निवेदनात निसर्गंध यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.