CBI raid Lalu Prasad Yadav : लालू यादव यांच्या अडचणी संपेनात; सीबीआयकडून 17 मालमत्तांवर छापे

रेल्वे भरती प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडीदेवी आणि त्यांची कन्या मिसा यांच्या 17 मालमत्तांवर सीबीआयने (CBI Raid) छापे घातले आहेत. रेल्वे भरती भ्रष्टाचार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून सीबीआयचे एक पथक यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवास्थानी पोहोचले आहे.

काय आहे हे नेमकं प्रकरण? 

चारा घोटाळा प्रकरणी तुरूंगवास भोगणाऱ्या लालू यादव यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली. परंतु, त्यांच्या अडचणी काही पाठ सोेडेनात. सीबीआयने पुन्हा लालू यांनी रडारवर घेत त्यांच्या एकूण 17 मालमत्तांवर छापे मारून कारवाईस सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना स्वस्त दरात जमिनीचा व्यवहार करून त्या बदल्यात ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र, या प्रकरणात व्यवहार करूनही खरेदीचे पैसे दिले नसल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

दरम्यान, या व्यवहारानंतर लालू यादव आणि त्यांच्या नातेवाईकांकडे दिल्ली, पाटणा, दानापूर यासह अनेक ठिकाणी जमीन खरेदीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यादव यांच्या कुटुंबीयांचे अकाऊंट डिटेल्स सुद्धा उघड झाले असून सद्यस्थितीत खात्यात एक कोटी 20 लाख रुपये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाला अखेर गांभीर्याने घेत सीबीआयकडून दिल्ली, बिहारमधील पाटणा आणि गोपालगंज येथील 17 ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.

सीबीआयच्या या छापेमारी प्रकरणावर आणि लालू यादव यांच्यावरील भ्रष्टाचार आरोपांवर आरजेडीकडून विरोध दर्शवण्यास येत असून सीबीआयची कारवाई पूर्णपणे पक्षपाती असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.