CBI Team Reaches Mumbai: सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल

CBI Team Reaches Mumbai: CBI team arrives in Mumbai to probe actor Sushant's death पैशांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात एसआयटी पथक गुरुवारी सायंकाळी दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सीबीआयला संपूर्ण मदत करणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही दिले आहेत. आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयची एसआयटी टीम मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या तपासात सहकार्य करण्यासाठी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सीबीआयची टीम वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आजच ताब्यात घेणार आहे.

या प्रकरणी सीबीआयने गुजरात केडरचे आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात एसआयटी तयार केली असून दिल्ली सीबीआय मुख्यालयात कार्यरत असलेल्या गुजरात केडरच्या महिला आयपीएस अधिकारी गगन दीप गंभीर यासुद्धा या टीमचा एक भाग आहेत. या प्रकरणात 10 सदस्यांची टीम एकत्र काम करेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सीबीआय टीमला तीन भागात विभागले गेले आहे. प्रत्येक टीममध्ये तीन सदस्य असतील आणि हे सर्व आयपीएस मनोज शशिधर यांना रिपोर्ट करतील.

या टीमची कार्यपद्धती आखून दिलेली असून पहिल्या टीमला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे उदाहरणार्थ – केस डायरी, क्राइम सीनची छायाचित्रे, शवविच्छेदन अहवाल, मुंबई पोलिसांचा फॉरेन्सिक रिपोर्ट, ऑटोप्सी रिपोर्ट आणि साक्षीदारांच्या जबाबांची प्रत आदी जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दुसरी टीम रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची, सुशांतची माजी मॅनेजर, सुशांतच्या घरी काम करणा-या लोकांची चौकशी करेल. घटनास्थळी हजर असलेल्या सर्वांचे जबाब नव्याने रेकॉर्ड केले जातील.

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सुशांतच्या पोस्टमॉर्टम करणा-या डॉक्टरांची तिसरी टीम चौकशी करेल. तसेच सीन ऑफ क्राइम रिक्रिएट करण्याचे कामही या टीमला देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सीबीआयची टीम देखील ईडीमार्फत केलेल्या मनी लाँडरिंग चौकशीच्या रिपोर्टच्या मदतीने हे प्रकरण पुढे नेईल.

सीबीआयचा तपास बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 341, 348, 380, 406, 420, 306 आणि 120 बी समाविष्ट आहेत. तसेच सीबीआयला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

त्यानुसार सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या? हे सर्वप्रथम शोधावे लागणार आहे. तसेच सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागील खरं कारण काय आहे? सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब आणि त्याच्या घरी काम करणा-यांचा काही संबंध आहे का? याचा देखील शोध घ्यावा लागणार आहे.

याशिवाय सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा काही संबंध आहे का? पैशांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणी निर्माण करण्यात आलेल्या अनेक शंकामध्ये सुशांतला मानसिक आजार होता असा देखील दावा करण्यात आला होता. त्यामुळे सुशांतच्या आजाराबद्दलचे नक्की सत्य काय आहे? तो खरोखर नैराश्येचा सामना करत होता का? याचा देखील आढावा घेतला जाईल.

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही माहिती लपवण्यात आली आहे का? साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आलेले जबाब खरे आहेत का? आणि 13 आणि 14 जून रोजी सुशांतच्या घरी नक्की काय काय घडले? याची इत्यंभूत माहिती ही टीम गोळा करेल.

या प्रकरणी तपास करणे सीबीआयसाठी आव्हानात्मक ठरु शकते. कारण सुशांतच्या मृत्यूला आता 60 दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणातील घटनास्थळावरील क्राइम सीन जवळजवळ पुसला गेला असू शकतो.

सीबीआयजवळ फक्त घटनास्थळावरुन घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार आहे. तसेच मुंबई पोलिसांचे या केसचे संपूर्ण रेकॉर्ड मराठी भाषेत आहे आणि त्याचा मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यास बराच काळ लागू शकेल. यात 56 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे.

सुशांतच्या मृत्यूचा कोणताही प्रत्यक्षदर्शी नाही, फक्त एकच माणूस आहे ज्याने मृतदेह लटकलेला पाहिला आणि त्यानेच मृतदेह खाली काढला. अशा परिस्थितीत मृतदेह कुठे लटकला होता आणि त्याचे पाय कुठे होते या गोष्टी समजून घेण्यासाठी सीबीआयला अडचणी येऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.