CBSE Exam : सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द तर, बारावीची परीक्षा पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बारावीची परीक्षा काही कालावधीनंतर घेतली जाईल. याबाबत एक जूनला आढावा घेतला जाईल. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

आज दुपारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले की, अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाईल. जर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, तर ते कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा देऊ शकतात.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक यापूर्वीच जारी करण्यात आलं होतं. बोर्डाच्या परीक्षा मेपासून सुरु होऊन 10 जूनपर्यंत सुरु राहणार होत्या. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. सीबीएसईच्या या बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात 4 मेपासून होणार होती. वेळापत्रकानुसार, 6 मे रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. 10 मे रोजी हिंदी, 11 मे रोजी उर्दू, 15 मे रोजी विज्ञान, 20 मे रोजी होम सायन्स, 21 मे रोजी गणित आणि 27 मे रोजी सामाजिक विज्ञानाची परीक्षा होणार होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.