Chikhali News : घरकुलमधील आणखी दोन इमारतींत ‘सीसीसी’ सेंटर

एमपीसी न्यूज – चिखली ‘घरकुल’ येथील एफ – 19 आणि बी – 9 या दोन इमारतींमध्येही प्रत्येकी 200 बेडचे कोरोना केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 1 कोटी 32 लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. महापालिका आयुक्तांच्या 19 मार्च रोजीच्या प्रस्तावानुसार चिखली घरकुल येथील डी 5 आणि डी 6  इमारतींमध्ये 200 बेडचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने घरकुल येथील डी – 7 आणि डी -8 या दोन इमारतींमध्येही कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. तेथे सध्या पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल आहेत.

याठिकाणी आयकॉन हॉस्पिटल यांना एका इमारतीतील 200 बेडसाठी प्रतिदिन प्रतिबेड 543 रुपये या दराने कामाचे आदेश देण्यात आले आहेत. आयकॉन हॉस्पिटल यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांना अजून 200 बेडचे सेंटर देता येऊ शकत असल्याचे दिसून येत आहे. चिखली घरकुल मधील एफ -19 आणि बी -9 या दोन इमारतींतही कोरोना केअर सेंटरसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पहिल्या टप्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने या इमारतींमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले नव्हते.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे आयकॉन हॉस्पिटल यांना तातडीची बाब म्हणून चिखली घरकुल येथील एफ 19 या इमारतीत 200 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बी – 9 या इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांना कामाचे आदेश दिले आहेत.

या दोन्ही रुग्णालयांना 22 एप्रिल ते 21 जून या दोन महिने कालावधीसाठी कोरोना केअर सेंटर चालविण्यास देण्यात येणार आहे. एका इमारतीसाठी 66 लाख 24 हजार रुपये खर्च होणार आहे. त्यानुसार दोन इमारतींसाठी 1 कोटी 32 लाख 49  हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.