Talegaon : साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार हे समाजातील प्रबोधन करणारी भावंडेच – डॉ. रामचंद्र देखणे

बाळशास्त्री जांभेकरांची जयंती उत्साहात साजरी 
 
एमपीसी न्यूज – साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार हे समाजातील प्रबोधन करणारी भावंडेच आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीतूनच खरा समाज घडत असतो. वृत्तपत्रातील ‘सामाजिक आशय’ हा वृतपत्राचा आत्मा आहे. तो टिकवला पाहिजे. तरच समाज समृद्ध होईल. प्रत्येक पत्रकार त्यांच्या शब्दाने प्रकाशित होत असतो. साहित्यिक व पत्रकार सूर्याशी मैत्री करत असतो, असे प्रतिपादन डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. 
 
तळेगाव शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे व योगीराज फौंडेशन यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 206 वी जयंती आज (मंगळवार, दि. 20) रोजी तळेगाव येथील योगीराज सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे, प्रमुख वक्ते डाॅ. रामचंद्र देखणे, प्रमुख पाहुणे सुधाकर जांभेकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तळेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळुंज, सुरेश साखवळकर (संयोजक) आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
 
तसेच यावेळी पुणे पीपल्स को आॅप बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, प्राचार्य डाॅ. डी. डी. बाळसराफ, सभागृह नेते सुशील सैंदाणे, पोलीस निरीक्षक मुगुट पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, गणेश खांडगे, संतोष भेगडे  विरोधी पक्ष नेत्या हेमलता खळदे, रवींद्र दाभाडे, गणेश भेगडे, अशोक काळोखे, संग्राम काकडे, उद्योजक किशोर आवारे, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, गणेश विनोदे, प्रभाकर तुमकर व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 
 
डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले की, "आजच्या पत्रकारितेमध्ये सेवाभाव कमी होत चालला आहे. त्याची जागा केवळ प्रसिद्धीने घेतली असून त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे, ही मोठी खंत आहे.  साहित्य कसे असावे, पत्रकारिता कशी असावी, याचा आदर्श बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिला. पत्रकारीता ही लोकसंवादी, विवेकसंवादी असावी, परखड असावी, निर्भीड विचारांची वास्तववादी असावी. असे विचार डाॅ. रामचंद्र देखणे यांनी पत्रकारितेविषयी चिंतन व्यक्त करताना केले. तसेच बाळशास्त्री जांभेकरांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन पत्रकारांनी करावे. 
 
चित्रा जगनाडे, कृष्णराव भेगडे व जांभेकर परिवाराच्या वतीने बाळशास्त्री जांभेकरांचे खापर पणतू बाजीराव सुधाकर जांभेकर यांनी मनोगते व्यक्त केली. 
 
कार्यक्रमात बाळकृष्ण नारायण देव लिखित बाळशास्त्रीचें चरित्र, बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेला सरसंग्रह, भूगोलविद्या, हिस्टरी ऑफ इंग्लंड (मराठी अनुवाद), इंट्रोडक्शन टू द हिस्ट्री या पुस्तकांची मराठी व गुजराती भाषांतरे, 1832 पासूनच्या ‘दर्पण’ या मासिकाचे निवडक अंक देखील यावेळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनात पहायला मिळाले. 
 
कार्यक्रमाची सुरूवात श्रुती देशपांडे, पंडित विनोदभूषण आल्पे, संपदा थिटे यांनी संगीत सादर करून केली. 
 
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार संघाचे सचिव अतुल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. एम. भसे, मनोहर दाभाडे, तात्यासाहेब धांडे, श्रीकांत चेपे, योगीराज फाउंडेशनचे आशिष मालपाठक यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आणि स्वागत साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांनी केले. सुत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले. तर आभार सोनबा गोपाळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.