Pimpri : इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा; महापौरांचे गणेश मंडळांना आवाहन 

एमपीसी न्यूज – निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेऊन सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती गणपती इको फ्रेंडली साजरा करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. तसेच गणेशोत्सवात समाजप्रबोधनपर चांगला संदेश जाईल असे देखावे तयार करावेत, असेही ते म्हणाले.  


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी देखील पर्यावरणपूरक तसेच शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांसमवेत आज (बुधवारी) चिंचवड, अॅटो क्लस्टर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य नामदेव ढाके, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, नामनिर्देशित सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, संदीप खोत, मनोज लोणकर, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रभाकर कोळी, सुर्यकांत मुथीयान, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, सुभाष चव्हाण, पोलीस मित्र संघटनेचे अशोक तनपुरे, संस्कार प्रतिष्ठानचे धनंजय सांवत, मच्छिंद्र कदम, हिंदु जनजागृती समितीचे अशोक कुलकर्णी, आंघोळीची गोळीचे सचिन काळभोर, राहुल धनवे, आझाद मित्र मंडळाचे अतुल नढे, श्री. भैरवनाथ युवक संघाचे आनंदा यादव, अखिल मंडई मित्र मंडळाचे अतुल पडवळ, श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाचे शिवाजी सुर्यवंशी, पीसीसीएफचे ऋषीकेश तपशाळकर यांच्यासह मोठया संख्येने सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकरी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, गणेश विर्सजन नदीमध्ये करतात तर काही जन हौदामध्ये करतात. काहींची हौदांची संख्या वाढविणेबाबत मागणी आहे. याकरीता सर्वांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन त्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल. महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक तेवढ्या सेवा सुविधा गणेशोत्सवात पुरविल्या जातील.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, सर्वांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन विसर्जनस्थळी सुरक्षारक्षक वाढविण्यात येतील. गणेशोत्सवात शांतता नांदली पाहिजे. पर्यावरण राखता आले पाहिजे.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी उपस्थितांना गणेशोत्सवासाठी रासयनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांनी बनविलेल्या शाडू मातीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. महोत्सवादरम्यान गुलाल अथवा अन्य रंगाचा वापर मिरवणूकीत करू नये. गणेशमूर्ती शक्यतो लहान आकाराची ठेवावी. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. विद्युत रोषणाई व ध्वनीक्षेपणाचा वापर मर्यादित ठेवावा. निर्माल्य व पूजा साहित्य नदी पात्रत न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे, नदीचे पाणी प्रदुषित न करणे बाबत सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित असलेल्या विविध स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधिंनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत सूचना मांडल्या. बैठकीचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. सूत्रसंचलन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार नगरसदस्य नामेदव ढाके यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.