Talegaon Dabhade : कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव उत्साहाने साजरा करा; आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटीचे पालन करून सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव उत्साहाने साजरा करा. असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी केले. घरातील कुंडामध्येच श्रीगणेशाचे विसर्जन करावयाचे असेल तर नगर परिषदेकडून अमोनिया बायकार्बोनेट पावडर मोफत देण्यात येणार असल्याचेही भेगडे म्हणाले.

 कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तळेगाव शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटीचे पालन करून उत्साहाने साजरा करावा.असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

सदर पत्रकार परिषद गुरूवार (दि 9)तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये घेण्यात आली. यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन, ज्येष्ठ नागरिक  प्रदीप साठे,  रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे आनंद आसवले, श्रीशैल मेंथे व इनरव्हील क्लबच्या काजल गोरोळे व यशवंत प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, आरोग्य निरीक्षक मयुर मिसाळ,कर निरीक्षक विशाल शहाणे,भांडार विभाग प्रमुख सतीश राऊत, रोहित भोसले आदी उपस्थित होते.

तळेगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा सात दिवसाचा असतो. हा उत्सव भक्तिभावाने साजरा करताना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे, गर्दी टाळणे, मर्यादित सदस्यांमध्ये सामुदायिक आरती करणे, कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वाटप करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, आधी सूचना सामाजिक कार्य म्हणून सार्वजनिक गणेश मंडळांनी पार पाडाव्यात.असे आवाहन भेगडे यांनी केले.

तसेच गणेश विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागात मूर्ती दान करण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असून रोज निर्माल्य संकलन देखील करण्यात येणार आहे. घरगुती गणपतीचे नागरिकांना जर घरातील कुंडामध्येच विसर्जन करावयाचे असेल तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून अमोनिया बायकार्बोनेट पावडर मोफत देण्यात येणार आहे. तसेच मूर्तीदान करण्यासाठी गाव भाग व स्टेशन भागात खास व्यवस्था केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.