Talegaon Dabhade News : कोरोना नियमांचे पालन करून श्रीराम जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

येथे सरसेनापती दाभाडे घराण्याच्या मालकीचे श्रीराम मंदिर आहे. यावर्षी कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून श्रीराम जन्मोत्सव समिती व मान्यवरांनी धार्मिक कार्यक्रम विधीवत करून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवायचा निर्णय घेतला होता.

त्याप्रमाणे  सकाळी  श्रीराम जन्मोत्सव समितीचे  संस्थापक अध्यक्ष विशाल दाभाडे व त्यांच्या पत्नी  विना यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी श्रीराम जन्माच्या प्रसंगी शारदीय भजन मंडळाच्या वतीने भजन व श्री राम जन्माचा पाळणा गाण्यात आला. व अल्प उपस्थिती मध्ये श्रीराम जन्म साजरा केला.

प्रत्येक वर्षी  या मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी अभिषेक, महापूजा, किर्तन, महाप्रसाद तसेच सायंकाळी श्री रामाच्या पादुका व प्रतिमा पालखीमध्ये ठेवून ढोल-ताशांच्या गजरामध्ये ग्राम प्रदक्षिणा करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम स्थगित केले, फक्त धार्मिक विधी  पार पाडून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.