Vadgaon Maval News : कोरोनाचे निर्बंध पाळून यंदाचा गणेशोत्सव आनंदाने साजरा करा – पोलीस निरीक्षक विलास भोसले

एमपीसी न्यूज – कोरोनाचे निर्बंध संपले नाहीत. गणेशोत्सव काळात शासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येतील. अफवा व खोट्या माहितीचा प्रचार प्रसार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोनाचे निर्बंध पाळून यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा करावा. जनतेने पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले.

वडगाव मावळ येथील भेगडे लान्स कार्यालयात गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व मुस्लिम बांधव यांच्या शुक्रवारी (दि.3) सायंकाळी 5:30 वा. आयोजित बैठकीत बोलत होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनिरीक्षक दिलीप देसाई, संतोष चामे, विजय वडोदे, शीला खोत, पदाधिकारी अनंता कुडे, किरण भिलारे, भाऊसाहेब ढोरे, तुषार वहिले, नितीन कुडे, बंटी वाघवले, सोमनाथ धोंगडे, प्रवीण ढोरे, शेखर वहिले, विनायक लवंगरे व बहुसंख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक भोसले म्हणाले गणेशोत्सव मंडळाने देखावे करायचे नाहीत. सार्वजनिक मंडळाने 4 फूट व घरगुती 2 फूट गणेश मूर्ती बसवावी. मंडळात पत्त्यांचा डाव खेळता येणार नाही, वर्गणी जबरदस्तीने गोळा करू नका तक्रार आल्यास गुन्हे दाखल होतील.

सकाळी 6 ते रात्री 10 दर्शन घेता येईल पण मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. स्पीकर केवळ विसर्जनाच्या वेळी सूचना देण्यासाठी वापरता येईल. मंडळाने मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतर ठेवावे. गणेश मूर्तीच्या सुरक्षेसाठी सतत दोन कार्यकर्ते उपस्थित ठेवावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मंडळात बोलावू नका. मंडळाचे मंदिर असल्यास गणेश मूर्ती मंदिरात स्थापन करावी. रस्त्यावर मंडप टाकून वाहतूक कोंडीला आमंत्रण देऊ नका. मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या पदाधिकारी त्यांचे मोबाईल नंबर यादी पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस पाटील यांनी वारंवार गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन तशी माहिती द्या. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा.

नगराध्यक्ष मयुर ढोरे म्हणाले  वडगाव नगरपंचायतीच्या गणेशोत्सव मंडळांना मास्क व सॅनिटायजर वाटप करणार. मंडळांनी सामाजिक प्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने घ्यावेत त्यांना सहकार्य करण्यात येईल. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा. विसर्जन तलाव वार्डात उपलब्ध करुन देण्यात येतील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव वाघमारे यांनी केले. आभार पोलीस उप निरीक्षक विजय वडोदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.