Nigdi Pradhikaran : प्राधिकरणात वसुबारस पूजन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज : भारत हा कृषिप्रधान देश आहे. उपजीविकेसाठी जरी बहुसंख्य नागरिक शहरात वास्तव्य करीत असले तरी बहुतेक सर्वांची नाळ ही कृषिसंस्कृतीशी जोडलेली आहे, त्या पारंपरिक संस्कृती अन् संस्कारांच्या प्रतीकांचे दर्शन गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी वसुबारस पूजनाच्या निमित्ताने प्राधिकरण, पेठ क्रमांक २४ मधील श्री केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडविण्यात आले.

 

केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि चक्रव्यूह मित्रमंडळ आयोजित वसुबारस पूजनाच्या कार्यक्रमात सवत्स धेनू अर्थातच गाय-वासरू यांच्या पायांवर पाणी घालून, कपाळावर हळदीकुंकवाचा टिळा लावून अन् पंचारतीने औक्षण करीत विधिवत पूजन करण्यात आले. या पूजनाचा प्रारंभ पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुविद्य पत्नी सविता बन्सी गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.

महिलांच्या तीन पिढ्यांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. लॉकडाउनच्या मोठ्या कालावधीनंतर प्रथमच हा सोहळा घेण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने प्रथम सॅनिटाईजरने हात स्वच्छ करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले. वातावरणाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. पशुधन आणि दूधदुभते कायम राहो! सर्वांना औदार्य, प्रसन्नता आणि समृद्धी लाभो! अशा कामना करीत महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावीत दीपावलीच्या शुभेच्छादेखील दिल्या.केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी आणि चक्रव्यूह मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळा शिंदे यांच्यासह सुरेश बुचके, विश्वास नलावडे, बापू सपकाळ, अनिल नामुलपल्ली, गीता नामुलपल्ली, सुशील सुतार, मोहिनी चिपकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.