Chakan News : 104 वर्षांच्या ठणठणीत आजीबाईंचा पंचक्रोशीने केला वाढदिवस साजरा

खासदार, आमदारांनीही केले अभीष्टचिंतन

एमपीसी न्यूज : रंगुबाई धोंडीबा गोरे…..  वय वर्ष 104… वयाची शंभरी ओलांडली तरी चाकण मधील या शेतकरी आजीबाई ठणठणीत आहेत. आधुनिक शब्दात सांगायचे झाले  एकदम फिट. काठी धरुन त्या अजूनही चालतात.  स्वत:ची सगळी कामे देखील स्वत:च करतात.  चाकण मध्ये साजरा झालेला त्यांचा 104 वा वाढदिवस ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरला. आजींनी सगळे नातेवाईक आणि पंचक्रोशीतील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा केला.

लहान मुलांचे आणि नेते मंडळींचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे झालेले आपण पाहतो. मात्र तब्बल शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस चाकण (ता. खेड)  मध्ये अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुले आणि नातवंडे व पतवंडानी आपल्या आजींचा चाकण मधील दावडमळा येथे नुकताच वाढदिवस साजरा केला आहे.

104 वर्षांच्या रंगुबाई धोंडीबा गोरे यांच्या घरासमोरील या अनोख्या वाढदिवसाला पंचक्रोशीतील नागरिक महिलांसह शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील अशा दिग्गज  नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली. आजींची आठवण कायम स्मृतीत राहावी यासाठी हा अनोखा सोहळा आयोजित केल्याचे त्यांचे चिरंजीव कुमार गोरे व नातू प्रशांत गोरे व पणतू, खापर पणतू आणि अन्य नातेवाईकांनी सांगितले.

रंगुबाई यांचे सगळे आयुष्य कष्टात गेले.  अगदी लहान वयात त्यांचा विवाह झाला आणि त्या पतीच्या घरी चाकण मध्ये रहायला आल्या. रंगुबाई यांनी अख्खे आयुष्य शेतात काम केले. शेतात राब राब राबल्या. संपूर्ण कोरोना काळातही त्या कधीही आजारी पडल्या नाहीत. साधी बाजरीची भाकरी व भाजी शिवाय त्यांनी इतर पदार्थांची क्वचितच चव घेतली असल्याचे नातेवाईक सांगतात. कदाचित हेच त्यांच्या एवढ्या प्रदीर्घ आयुष्याचे रहस्य असावे असे मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.