Pimpri : उद्योगनगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी

एमपीसी  न्यूज – साफसफाई करुन लख्ख केलेली यंत्रसामुग्री, झेंडूची फुले, अंब्याच्या डहाळ्यांनी सजलेली प्रवेशव्दारे, गालिचा रांगोळींचा सडा, यंत्र पूजनाची लगबग अशा वातावरणात पिंपरी-चिंचवड कामगारनगरी आज (बुधवारी) न्हावून निघाली होती. निमित्त होते कामगारविश्‍वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या खंडेनवमीच्या सणाचे.

पिंपरी-चिंचड शहर ही कामगारनगरी म्हणून परिचित आहे. शहरात सुमारे साडेसहा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा आहे. उद्योगनगरीमध्ये यादिवशी यंत्रसामग्रीचे पूजन केले जाते. त्यामुळे शहरात खंडेनवमीला विशेष महत्त्व आहे. अलीकडे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढत असला तरी या उत्सवाच्या परंपरेत कोणताही खंड पडलेला नाही.याउलट अलीकडे यंत्रपूजेबरोबरच सांस्कृतिक उपक्रम देखील राबविले जात आहेत.

सर्वच लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करण्यात आली. कारखान्याच्या प्रवेशव्दारांवर तोरणे लावण्यात आली होती. रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. यंत्रांची साफसफाई करण्यात आली. फुलांची आरास करुन यंत्रसामग्री तसेच परिसर सजविण्यात आला होता. यंत्रसामग्रीचे पारंपरिक पध्दतीने पूजा करुन पेढ्यांचे वाटप करण्यात आले. कामगारांचा उत्साह अवर्णनीय होता. व्यवस्थापन व कामगारांनी एकमेकांना शुभेच्छा देत खंडेनवमीचा आनंद व्दिगुणित केला.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा कणा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी, चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये पारंपारिक पध्दतीने यंत्रसामुग्रीची पूजा करीत खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यात उत्साहाने भाग घेतला. पिंपरी, चिंचवड व चिखली कारखान्यांमध्ये असेंब्ली लाईन्स, ईआरसी, फौंड्री, ट्रेनिंग डिव्हीजन, इंजिन शाप, पी. ई. आदी महत्त्वाच्या ठिकाणी पूजा करण्यात आली. चिंचवड आकुर्डी येथील प्रिमियम ट्रान्सेशन कंपनीत कामगार वर्गांनी यंत्राची पूजा केली. यावेळी मुख्य व्यवस्थापक निरज भटेरिया, उपव्यवस्थापक जयंत हर्षे, युनियनचे एम. बी. रोहम, कॉम्रेड व्ही. व्ही. कदम, एच. डी. गोडसे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.