Pune News : तळजाई टेकडीवर सिमेंटचे बांधकाम होणार नाही – ॲड.वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – तळजाई वरील जैवविविधता प्रकल्पाची सुधारित आखणी केली जाईल तसेच या ठिकाणी असलेले सिमेंट क्रॉक्रीटचे ब्लॉक, राडारोडा येत्या 24 तासात उचलला जाईल. तळजाई टेकडीवर नव्याने कुठलेही सिमेंटचे बांधकाम केले जाणार नाही, अशी ग्वाही वन विभागाने दिली असल्याची माहिती खासदार ॲड.वंदना चव्हाण यांनी दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित बुधवारी तळजाई बचाव अभियानाच्या सदस्यांनी खासदार ॲड.चव्हाण यांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी उप वनसंरक्षक राहुल पाटील अभियानाचे इंद्रनील सदगले, अमित अभ्यंकर, इंद्रजित चिखलीकर आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत जैवविविधता पूर्ववत करण्याच्या दृष्टीने वन अधिकारी, पर्यावरण संवर्धनाची जाण असणारे राजकीय प्रतिनिधी, पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून तळजाई बचाव अभियान सदस्य यांची टीम तयार करून त्यांच्या देखरेखीखाली एक महिन्यात आराखडा बनविण्यात येईल व त्याची कालबध्द अंमलबजावणी केली जाईल असे वन विभागाने सांगितले असल्याचे खा. चव्हाण म्हणाल्या.

तळजाईवरील प्रकल्पाची सर्व संबंधित कागदपत्रे नागरिकांना 24 तासात खुली केली जाणार असून, या वन क्षेत्रात असणारे सगळे जेसीबी मशिनरी 24 तासात बाहेर नेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. याचबरोबर पेव्हर ब्लॉक्स, सिमेंट यांचे पथ, कठडे, सिमेंटचे कोणतेही बांधकाम सात दिवसात काढून टाकले जाईल अशी ग्वाही मिळाली असल्याची माहिती खा.चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.