Pimpri: केंद्र सरकार ‘एचए’ कंपनी विकण्याच्या तयारीत?

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून तोट्यात असलेली आणि आर्थिक संकटात आलेली पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनी (‘एचए’) केंद्र सरकार विकण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. ‘एचए’ बरोबरच देशातील तोट्यात असलेल्या 28 कंपन्याची यादी सरकारने विक्रीसाठी तयार केली आहे. दरम्यान, ‘एचए’च मजदूर संघाचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना त्याचा इन्कार केला आहे.

पिंपरी येथे एचए कंपनीची स्थापना झाल्यावर सुरुवातीच्या काळात पेनिसिलीनचे उत्पादन केले जात असे. त्यामुळे, कंपनीकडे पेनिसिलीन उत्पादनांचा कारखाना म्हणून पाहिले जात होते. त्यानंतर, इतर जीवरक्षक औषधे, कृषी आणि पशुचिकित्सा विषयक औषधांची निर्मिती आणि विक्री सुरु झाली. तेव्हापासून, देशभरात कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो. एचए कंपनीमुळे ख-या अर्थाने पिंपरी-चिंचवडची औद्योगिकनगरी अशी ओळख देशभरात झाली. एचएमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला.

मागील काही वर्षांपासून ‘एचए’ कंपनी आर्थिक संकटात आली आहे. ‘एचए’ कंपनी आर्थिक संकटात असल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कामगारांचा नियमितपणे पगार होत नाही. कंपनी तोट्यात असल्याने केंद्र सरकारने विक्रीची तयारी सुरु केली आहे. याशिवाय  सरकारने आतापर्यंत 28 कंपन्यांची यादी व्रिक्रीसाठी तयार केल्याची माहिती आहे. या कंपन्यामध्ये हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए)सह, स्कूटर इंडिया लिमिटेड, ब्रिज अँण्ड रुफ इंडिया लिमिटेड, हिंदुस्थान न्यूजप्रिंट, भारत पंप अॅण्ड कम्प्रेसर, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, भारत पेट्रोलियम,  एचपीएल अशा 28 कंपन्याची यादी तयार केली आहे.

दरम्यान, ‘एचए’ कंपनी विक्रीकरण्याबाबत असे काहीही नसल्याचे  हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) मजदुर संघाचे अध्यक्ष, मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.