Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा; पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाला विजेतेपद !!

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाचा ७-५ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इन्कम टॅक्स, पुणे संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले.

अभिषेक कुमार याने चार गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच इनकम टॅक्स संघाच्या आशुतोष लिंगेश, प्रदीप मोर आणि संजय यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी संघाकडून देवेंद्र वाल्मिकी, दर्शन घुमारे, प्रिन्स चौरसिया, युवराज वाल्मिकी आणि फिलीप बा यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. इन्कम टॅक्स संघाने पुर्वार्धातच ५-१ अशी विजयी आघाडी घेतली असल्याने सामना जिंकण्यास त्यांना फार प्रयत्न नाही पडले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे संयोजन समितीचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड आणि विजेंद्र गायकवाड, हॉकी महाराष्ट्रचे मानद सचिव मनोज भोर, हॉकी महाराष्ट्र अध्यक्ष मनिष आनंद, स्पर्धेचे संचालक स्टॅनली डिसुझा, संयोजन समितीचे सदस्य कमलाकर गायकवाड आणि ऑलंपिक खेळाडू विक्रम पिल्ले यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेतील विजेत्या इन्कम टॅक्स संघाला १५ हजार रूपये आणि पिल्ले अ‍ॅकॅडमी संघाला ७५०० रूपये तर, तिसरे स्थान पटकवणार्‍या एफसीआय संघाला पाच हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः इन्कम टॅक्स, पुणेः ७ (अभिषेक कुमार २, १९, २२, ५४ मि., आशुतोष लिंगेश ४ मि., प्रदीप मोर २७ मि., संजय ४४ मि.) वि.वि. विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अः ५ (देवेंद्र वाल्मिकी १० मि., दर्शन घुमारे ३३ मि., प्रिन्स चौरसिया ४० मि., युवराज वाल्मिकी ५६ मि., फिलीप बा ५९ मि.); हाफ टाईमः ५-१;तिसर्‍या स्थानासाठीः फुड कॉर्पोरेटन ऑफ इंडियाः १ (विनय नेरकट २४ मि.) वि.वि. सुपर इलेव्हनः ०; हाफ टाईमः १-०.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like