Pune : सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ ; एका तासात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून एकाच दिवसात शहराच्या वेगवेळ्या भागात अवघ्या एका तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केला आहे. समर्थ, वानवडी, फरासखाना बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या घटना घडल्या.
शहराच्या मध्यवस्तीमध्ये नारायण पेठेत लोखंडे तालीम जवळ पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर काही वेळातच फडके हौद चौकाजवळ चोरटयांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. त्यानंतर आरसीएम गुजराथी कॉलेजजवळ एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पहाटे कॅनरा बँकेजवळून पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटयांनी पोबारा केला. संबंधित महिलेने तात्काळ घरी जाऊन पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. वानवडी येथे एका पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली. तर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खडीचे मैदान येथे एका ८३ वर्षाच्या महिलेचे ३ तोळ्यांचा दागिना लंपास केला. नलिनी उनवणे असे महिलेचे नाव आहे.
शहरात सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी केली जात आहे.