Vadgaon Maval : आजच्या पिढीला सुसंस्कृत बनविण्यासाठी ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारांची गरज – हभप चैतन्य महाराज वाडेकर

एमपीसी न्यूज – आजची पिढी मर्यादा व आचरण विसरली आहे. वैचारिक प्रदूषण वाढले आहे. आजच्या पिढीला सुसंस्कृत बनवायचे असेल तर ज्ञानोबा, तुकोबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले. आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा॥ सकळांच्या पायी माझे दंडवत। आपुलालें चित्त शुध्द करा॥ या तुकाराम महाराजांच्या अभंगावर त्यांनी निरूपण करत ‘मानवी जीवन आणि संत साहित्याची आवश्यकता’ हा विषय मांडला. संताच्या जीवनातील वैचारिक उंची व आपली वैचारिक उंची तपासून घेऊन जगले पाहीजे, असेही चैतन्य महाराज यांनी सांगितले.

मावळ विचार मंचने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना युवा कीर्तनकार चैतन्यमहाराज वाडेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ तर प्रमुख पाहूणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार होते.

यावेळी पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,सचिव अनंता कुडे, मावळ मंचचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष शंकर भोंडवे, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, हभप नंदकुमार भसे, शांताराम कदम, यदुनाथ चोरघे, रवींद्र घारे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रेसह मोठ्या संख्येने नागरीक व महिला भगिनी उपस्थित होत्या.

युवा कीर्तनकार चैतन्यमहाराज वाडेकर यांनी मानवी जीवन आणि संत साहित्याची आवश्यकता या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले की, ‘प्रत्येकाने आपल्या हितासाठी व कल्याणासाठी जागे असले पाहीजे आणि कुटुंबातील प्रत्येक घटकांशी संवाद होणे महत्वाचे आहे.’

कोरोनाच्या कालावधीत असंख्य माणसांना जीव गमवावा लागला, तरी सुद्धा परमेश्वर आमचा नंबर जीवंत राहणा-यामध्ये लावतो, जीवंत ठेवतो याचाच अर्थ आता तरी…..

आतापर्यंत आपण तुकोबा, ज्ञानोबांच्या विचारांनी आयुष्य समृद्ध करायला हवं होते परंतु आपल्याला तशी निकड भासली नाही, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्रभूमी आहे, असे असताना गाथा, ज्ञानेश्वरी अथवा शिवचरित्राचे आपल्याकडून वाचन होऊ नये? मोठे दुर्दैवाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

आयुष्य कसे जगावे हे गाथा सांगते तर आयुष्यातील समस्यां निवारण ज्ञानेश्वरी करते. गाथेच्या विचाराने आपण आयुष्य जगले पाहीजे. मानवी जीवन कोणत्या दिशेने जात आहे याकडे आपण पाहिले पाहीजे. चांगल्या कर्माने आणि नितीने आयुष्य जगावे परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. माळ घाला अगर घालु नका, घालणे जमत नसेल तर त्या मार्गाला जाऊ नये. भक्ती ही सुळावर टांगलेल्या पोळी सारखी असते. असे समग्र वास्तव मांडले. अजूनही मानवी जीवन दुरूस्त करण्यासाठी समाज त्या दिशेने पाऊल टाकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आतातरी….

तरूणपणातील आत्महत्या, वेगवेगळया मार्गाने भरकटलेली तरूणाई यांना थांबविण्यासाठी संत साहित्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित वाडेकर महाराजांनी केले.

दगडासहित गाथा पाण्यावर तरला, हाडा मासांची माणसं का तरणार नाही? असा प्रश्न उपस्थित करून त्यासाठी संगत बदलली पाहीजे. संगत आपल्या जीवनात प्रभावी काम करते असेही वाडेकर महाराजांनी आवर्जून सांगितले.

कावळा आणि राजहंस कथेवरून दिसून येते की, संगती किती महत्त्वाची आहे. आपल्या जीवनात राजावर प्रामाणिकपणे उपकार करूनही राजहंसाला आपला जीव गमवावा लागला. का तर संगत चुकल्यामुळे. चांगले कर्माने, नितीने वागूनही जीवनात अपयश का? दु:ख का आहे. त्यासाठी संत साहित्याची आवश्यकता ही संगत बदलण्यास भाग पाडते असे ही महाराज म्हणाले.

अर्थात गाथ्यातील विचाराला बांधले पाहीजे आणि त्या अनुषंगाने जगले पाहीजे. विचारांची देवाणघेवाण करणे फार मोठे पुण्याचे काम असल्याचे सांगत महाराजांनी व्याख्यानमालेचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक करायलाही चैतन्यमहाराज विसरले नाहीत.

संताच्या जीवनातील वैचारिक उंची व आपली वैचारिक उंची तपासून घेऊन जगले पाहीजे.माणसं बदलली म्हणजे बुद्धी बदलते, मात्र बुद्धीचा बदल हा सकारात्मकतेत व्हायला हवा, नकारात्मकतेत नको. बुद्धीचा बदल अपरिहार्य असलातरी तो सकारात्मक हवा असेही ते म्हणाले.

आजची पिढी मर्यादा व आचरण विसरली आहे. वैचारिक प्रदुषण वाढले आहे.ती सुसंस्कृत बनवायची असेल तर ज्ञानोबा, तुकोबांच्या विचाराशिवाय आज पर्याय नाही.

संताच्या जीवनातील वैचारिक उंची व आपली वैचारिक उंची याच्यातील फरक तपासला पाहीजे. रामेश्वर भट्टांनी गाथा इंद्रायणीत बुडवून अनगड शहाच्या विहिरीवर अंघोळ केली. त्याबरोबर त्यांच्या अंगाचा दाह सुरू झाला. दाह काही केल्या थांबेना शेवटी दाह कमी करण्यासाठी रामेश्वर भट्ट संत ज्ञानेश्वरांकडे माफी मागून दाह थांबविण्यासाठी विनवणी करू लागले मात्र ज्ञानेश्वरांनी त्यांना संत तुकाराम महाराज हेच दाह थांबवतील असा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आग थांबवली ही खरी परोपकाराची उंची असल्याचे चैतन्यमहाराजांनी स्पष्ट सांगितले.

चित्रा वाघ व नंदकुमार शेलार यांनी मनोगत व्यक्त करून व्याख्यानमाला उपक्रमाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सन्मानपत्राचे वाचन व परिचय माधवी बाळासाहेब बोरावके, अर्चना अनंता कुडे यांनी केले.सूत्रसंचालन गिरीश गुजरानी यांनी केले तर आभार मानसी चिखलीकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.