Chakan : खेड मधील सोळा ग्रामपंचायतींना हक्काचा निवारा

एमपीसी न्यूज- बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील 16 ग्रामपंचायत कार्यालयांना नुकतीच मंजुरी मिळालेली आहे.

ग्रामीण भागासाठी पायाभुत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन 1 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या व स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःचे हक्काचे कार्यालय मिळण्यासाठी शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत खेड तालुक्याला पूर्वी दहा आणि आता मौजे आहिरे, आसखेड खु., आसखेड बु., एकलहरे, वराळे आणि परसुल अशा 6 ग्रामपंचायत कार्यालयांना नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. सदर योजनेंतर्गत खेड तालुक्यात एकूण 16 ग्रामपंचायत कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे, अशी माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

आमदार गोरे यांनी सांगितले की, ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयीन इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनें’तर्गत इमारत बांधून देण्यात येते. या योजनेला नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागांतील राज्यभरातील सुमारे 4 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 12 लाख आणि 1000 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख निधी मंजूर करण्यात येत आहे. या निधीपैकी 90 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.