Chakan : दोन वेगवेगळ्या घटनेत इलेक्ट्रिक डीपीमधून 188 किलो तांब्याच्या तारा चोरल्या!

एमपीसी न्यूज – दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये इलेक्ट्रिक डीपीमधून 188 किलो तांब्याच्या तारा चोरल्या. तसेच 430 लिटर ऑइल सांडून नुकसान केले आहे. या घटना भामा नदीवरील काळूस आणि गोणवडी गावात घडल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

पहिला प्रकार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता खेड तालुक्यातील भाम नदीवर असलेल्या काळूस गावात उघडकीस आला. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सुरेश फुलचंद ताकसांडे (वय 35) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी खेड तालुक्यातील काळूस गावच्या हद्दीत भामा बंधा-यावर असलेल्या रोहित्रातील (इलेक्ट्रिक डीपी) 40 हजार रुपये किमतीच्या 108 किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. तसेच डीपीमधील 20 हजारांचे 230 लिटर ऑइल सांडून नुकसान केले.

दुसरा प्रकार 5 फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास भामा नदीवरील गोणवडी गावच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी वायरमन दादाभाऊ भिकाजी सांडभोर (वय 60) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गोणवाडी गावच्या हद्दीत भामा नदीच्या काठावर असलेल्या डीपीमधून 48 हजारांच्या 80 किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. तसेच 15 हजारांचे 200 लिटर ऑइल सांडून नुकसान केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.