Chakan : गतिमंद मुलाला दारू पाजू नका म्हणणाऱ्या बापाला मारहाण

एमपीसी न्यूज – गतिमंद मुलाला दारू पाजू नका, असे सांगणाऱ्या बापाला दोन जणांनी मिळून टॉमीने मारहाण केली. तर जखमी व्यक्तीच्या मुलीला देखील शिवीगाळ आणि दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि. 3) खेड तालुक्यातील शिवे गावात रात्री पावणेनऊ वाजता घडली. याबाबत सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्माराम शंकर कडुसकर, रोहन आत्माराम कडुसकर (दोघे रा. शिवे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शंकर रामचंद्र शिवेकर (वय 65, रा. शिवे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवेकर यांचा मुलगा गतिमंद आहे. आरोपी त्या मुलाला रविवारी रात्री दारू पाजत होते. त्यामुळे शिवेकर यांनी ‘माझ्या मुलाला दारू पाजू नका, तो गतिमंद आहे’ असे म्हणून आरोपींना रोखले. याचा राग आल्याने आरोपी आत्माराम याने हाताने व लाथाबुक्यांनी तर आरोपी रोहन याने लोखंडी टॉमीने डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी शिवेकर यांची मुलगी शुभांगी भांडणे सोडविण्यासाठी आल्या. आरोपींनी शुभांगी यांचा हात पिरगळून शिवीगाळ करत दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.