Chakan : विनाकारण काचेची बाटली डोक्यात फोडून मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत असलेल्या एकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून जखमी केले. तसेच जखमी व्यक्तीच्या मित्रालाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेतीनच्या सुमारास चक्रेश्वर पार्क, कडाचीवाडी येथे घडली.

गिरीश सोपान साळुंखे (वय 40, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी संतोष राऊत (वय 24), तेजस मच्छिंद्र राऊत (दोघे रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळुंखे त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून कडाचीवाडी येथील चक्रेश्वर पार्क जवळ गेले. तिथे दोघेजण मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून बोलत होते. त्यावेळी साळुंखे यांच्या घराशेजारी राहणारा आरोपी सनी तिथे आला. त्याने साळुंखे यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली.

आरोपी तेजस याने साळुंखे यांच्या पोटात आणि पाठीवर मारहाण केली. यामध्ये साळुंखे गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.