Chakan : मायलेकरांचा एकत्रित आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू; आईची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज – काळूस ( ता. खेड, जि.पुणे) येथील जाचक वस्तीवरील मायलेकरांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध प्राशन केल्यानंतर लगेचच मुलाने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विषारी औषध प्राशन केल्याने आईची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेच्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण पोलिसांनी सोमवारी (दि. 5)  रात्री उशिरा याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.

दीपक दशरथ जाचक ( वय – २६ वर्षे, रा. जाचक वस्ती, काळूस, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची आई विठाबाई दशरथ जाचक ( वय – ६० वर्षे) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील एका खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दीपक याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी दीपक जाचक याने एक मृत्युपूर्व चिट्ठी (सूसाईड नोट)  लिहून ठेवली होती. त्यात  ‘मी स्वतः दीपक जाचक आणि आई विठाबाई जाचक’ आम्ही दोघेही आत्महत्या करत आहोत. याबाबत कोणाला जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव आणि त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like