Chakan : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाईट शाखेत दरोड्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील पाईट येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेची भिंत पाडून बँकेत प्रवेश करून स्ट्रॉंगरूममध्ये प्रवेश केला. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) पहाटे घडली.

अनिकेत अशोक देशपांडे (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पाईट येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत अनिकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या बाथरूमची भिंत पडून भगदाड पाडले. त्यावाटे बँकेत प्रवेश केला.

बँकेतील दोन लाकडी दरवाजे आणि लोखंडी चॅनल गेट तोडून नुकसान केले. बँकेतील सामान अस्ताव्यस्त टाकून बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये प्रवेश केला. स्ट्रॉंगरूम मधील तिजोरी उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना तिजोरी उघडता आली नाही. तिजोरी उघडता न आल्याने चोरट्यांना बँकेतून काहीही चोरटा आले नाही. बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यावरून शाखा व्यवस्थापक अनिकेत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.