Chakan : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरूणा-या एका सराईत चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चार तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मंगलसिंग बजरंग राजपूत (वय 21, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचा धनराज शांत्या शेरावत (रा. सणसवाडी, ता. शिरूर) हा साथीदार अद्याप फरार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणजवळ भोसे गावात हॉटेल राजयोग समोर रस्त्यावरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावले. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली. त्यानंतर, 25 ऑक्टोबर रोजी चाकण येथे जय भारत चौकाच्या कमानीजवळ आणखी एका महिलेचे गंठण चोरीला गेले. दोन्ही घटनेची चाकण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. दोन्ही प्रकारात चोरटा मोटारसायकलवरून आल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार, परिसरात शोधमोहीम राबवून चाकण पोलिसांनी आरोपी मंगलसिंग याला केटीएम दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या धनराज या साथीदारासोबत मिळून वरील गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोने जप्त केले आहे. आरोपी मंगलसिंग हा सराईत चोरटा असून तो मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावतो. त्याने अशा प्रकारचे गुन्हे आळंदी, भोसरी एमआयडीसी, चिखली परिसरात देखील केले असल्याचे सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस कर्मचारी सुरेश हिंगे, संजय जरे, बापू सोनवणे, हनुमंत कांबळे, वीरसेन गायकवाड, प्रदीप राळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, मछिंद्र भांबुरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.